विमानतळ नको म्हणून आंदोलन करणारे मंचावर; राणेंचा ठाकरेंना टोला

139

चिपी/ प्रतिनिधी : सिंधुदुर्ग आता हवाई वाहतुकीच्या नकाशावर झळकणार आहे. चिपी (ता. वेंगुर्ले) येथील सिंधुदुर्ग विमानतळ नियमित हवाई सेवेसाठी सज्ज झालं असून त्याचं उद्घाटन आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने हा एक ऐतिहासिक टप्पा आहे. साडेनऊ तासांचा मुंबई प्रवास अवघ्या दीड तासांवर आला आहे. याचा सिंधुदुर्गाच्या विकासात मोठा फायदा होणार आहे. या कार्यक्रमाचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात कधीकाळी शिवसेनेत एकत्र असणारे हे दोन नेते सध्या एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जातात. गेल्या काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांचं उद्धव ठाकरे यांच्याबाबतचं वादग्रस्त वक्तव्य आणि त्यानंतर त्यांचं अटकसत्र या पार्श्वभूमीवर आजचा हा कार्यक्रम आणि त्यांचं एका मंचावर येणं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं आहे. ते दोघेही काय बोलतात याकडेही जनतेचं लक्ष लागून राहिलेलं होतं.

नारायण राणे यांनी आपल्या मनोगतात उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला अनेक टोले लगावले आहेत. त्यांनी म्हटलंय की, विमानतळ नको म्हणून आंदोलन करणारे सध्या मंचावर आहेत. विमानतळावरुन उतरल्यावर जनतेनं काय खड्डे बघायचे का? आदित्य ठाकरे माझ्यासाठी टॅक्स फ्री आहेत. लोकप्रतिनिधी काय करतात, हे जाणून घेण्यासाठी कुणाला तरी नेमा, असा सल्ला त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. तसेच विनायक राऊतांनी पेढ्याचा गुणधर्म आत्मसात करावा, असा सल्लाही त्यांनी दिलाय.

राणेंनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा देत यावेळी म्हटलंय की, माझ्या जीवनातील अतिशय आनंदाचा क्षण म्हणा, दिवस म्हणा, तो आज आहे. अशा क्षणी कोणतंही राजकारण नको, असं मला वाटत होतं. या विमानतळावरुन उडणारं विमान डोळेभरुन पहावं, या स्तुत्य हेतून मी आज आलो आहे. इथं विमान पाहिलं, फार बरं वाटलंय मला. मंचकावर येण्याआधी मुख्यमंत्रीही भेटले. काहीतरी माझ्या कानाजवळ बोलले.

पुढे ते म्हणाले की, देशी परदेशी पर्यटक सिंधुदुर्गात यावेत, राहावं, चारपाच लाख रुपये खर्च करावे, इथल्या लोकांकडे पैसे यावेत, या उद्देशाने हे विमानतळ व्हावं, अशी माझी इच्छा होती.मी जन्मलो इथेच, पण माझं मुंबई हे कार्यक्षेत्र झालं, त्यानंतर मला बाळासाहेबांनी मला जिल्ह्यात परत पाठवलं. त्यानंतर मी जिल्हा संपूर्ण फिरलो, अडचणी समस्या जाणून घेतल्या. या जिल्ह्यात पाच हजार मिली पाऊस पडतो पण फेब्रुवारीनंतर पिण्याचे पाणी नसायचं. रस्ते नव्हते. अनेक गावांना वीज नव्हती, अंधारात असायचे. शाळा असले तर वर्ग नाही, वर्ग असले तर शिक्षक नाहीत, अशी अवस्था होती. इथली मुले नोकरीसाठी मुंबई पुण्यावरच अवलंबून होती. मुंबईवर अवलंबून असलेला हा जिल्हा मी आल्यावर विकास करायाच ठरवला. पण विकासाचं श्रेय मी घेणार नाही, ते लोक ठरवतील.

लोक ठरवतील कुणी विकास केला. उद्धवजी हे सगळं साहेबांच्या प्रेरणेतून त्याची अंमलबजावणी इथे करत होतो. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकास अजून कोणत्याप्रकारे करता येईल, याचा सल्ला घेण्यासाठी मी टाटाकडे गेलो. त्यांनी 481 पानांचा रिपोर्ट दिला. त्यांनी टुरीझमसाठी साठी पर्याय दिले, असं सांगत त्यांनी आपण केलेल्या कामाचा पाढा वाचून दाखवला आहे.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here