रायगड -रत्नागिरी जिल्ह्यांनी घेतली भरारी…!
२०१९ मध्ये भोगवेची झाली होती निवड : २०२५ मध्ये मेढा-निवतीचा प्रस्तावही केंद्राकडे – आंतरराष्ट्रीय मानांकनाचे पुढे काय?
सिंधुदुर्ग/ विशेष प्रतिनिधी – कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या नकाशावर प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या ‘ब्लू फ्लॅग’ मानांकनाच्या शर्यतीत रत्नागिरी-रायगड या जिल्ह्यांनी बाजी मारली असताना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे निसर्गसमृद्ध समुद्रकिनारे मात्र अद्याप प्रतीक्षेत आहेत.
गुहागर आणि लाडघर या रत्नागिरीतील समुद्रकिनाऱ्यांसह रायगडमधील श्रीवर्धनला २०२६-२७ या हंगामासाठी आंतरराष्ट्रीय ‘ब्लू फ्लॅग’ पुरस्कार जाहीर झाला आहे. मात्र, सिंधुदुर्गातील भोगवे आणि मेढा-निवती किनाऱ्यांचे पुढे काय झाले, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
जगभरातील सर्वोत्कृष्ट ‘बीच’साठी आंतरराष्ट्रीय स्तरावर दिल्या जाणाऱ्या ऑस्कर दर्जाच्या या ‘ ब्लू फ्लॅग ‘ मानांकनासाठी भारतातर्फे आठ सर्वांग सुंदर ‘बीच’ ची निवड करण्यात आली होती त्यामध्ये महाराष्ट्रातील एकमेव आणि सर्वांग सुंदर ‘बीच’ म्हणून सिंधुदुर्गातील ‘भोगवे बीच’ ची निवड करण्यात आली होती.समुद्री पाण्याचा दर्जा, किनाऱ्यावरील स्वच्छता,कनेक्टिव्हिटी, पर्यावरण व्यवस्थापन, व योग्य माहितीची देवाण-घेवाण या सर्व निकषांवर आधारित ही निवड करण्यात आली होती. हे ‘ब्लू फ्लॅग ‘मानांकन जर ‘भोगवे बीच’ला प्राप्त झाले तर जगाच्या पर्यटन नकाशावर ‘भोगवे बीच ‘हे ‘ब्लू फ्लॅग बीच ‘ म्हणून ठळकपणे ओळखले जाणार होते. त्यामुळे जगभरातील पर्यटकांचे ते आकर्षण ठरणार होते.तत्कालीन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी यासाठी भरपूर पाठपुरावा केला होता मात्र मानांकन मिळण्याचे दृष्टीने चौधरी यांच्या नंतर कोणी फारसा पाठपुरावा केल्याचे दिसत नाही.
विशेष म्हणजे, सिंधुदुर्गच्या भोगवे समुद्रकिनाऱ्याचे नाव या उपक्रमात २०१८ पासूनच आघाडीवर होते.
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने २, डिसेंबर,२०१९ रोजी देशातील १३ समुद्रकिनाऱ्यांची ‘ब्लू फ्लॅग’ उपक्रमासाठी पथदर्शी किनारे म्हणून निवड जाहीर केली होती. त्यामध्ये महाराष्ट्रातील ‘भोगव बीच’चा समावेश होता. मात्र, ही निवड म्हणजे प्रत्यक्ष आंतरराष्ट्रीय ‘ ब्लू फ्लॅग ‘ प्रमाणपत्र मिळणे एवढेच नव्हते. आवश्यक पायाभूत सुविधा आणि अन्य निकष पूर्ण करून अंतिम मानांकन मिळविण्याची प्रक्रिया त्यानंतर अपेक्षित होती.
भोगवेच्या बाबतीत रस्ते, पार्किंग आणि आवश्यक पायाभूत सुविधांसाठी जागेची उपलब्धता हा अडथळा असल्याचे २०१९ मध्येच समोर आले होते. त्यामुळे या प्रकल्पाची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि अंतिम मानांकनाचा प्रवास रखडल्याचे दिसते.
मेढा-निवतीचा प्रस्ताव केंद्राकडे…!
दरम्यान, सिंधुदुर्गसाठी आणखी एक महत्त्वाची घडामोड एप्रिल,२०२५ मध्ये घडली. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व हवामान बदल विभागाने ‘ब्लू फ्लॅग’ प्रमाणपत्रासाठी राज्यातील सात संभाव्य समुद्रकिनाऱ्यांची निवड केली. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘मेढा-निवती’ समुद्रकिनाऱ्याचा समावेश होता असे समजते.
या समुद्रकिनाऱ्यांची मार्च-एप्रिल २०२५ मध्ये पाहणी करण्यात आली. ‘ब्लू फ्लॅग’चे राष्ट्रीय ऑपरेटर डॉ. कुरुप यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत मानांकन निकषांबाबत चर्चाही केली. त्यानंतर २८, एप्रिल २०२५ रोजी तसा प्रस्ताव पुढील पडताळणीसाठी पाठविण्यात आल्याचे समजते. मात्र, या प्रस्तावाला पुढे अंतिम मान्यता मिळाली किंवा कसे याबाबत स्पष्ट माहिती अद्याप समोर आलेली नाही.
रत्नागिरीला-रायगड आघाडीवर, सिंधुदुर्ग मागे का…?
आता २०२६-२७ च्या हंगामासाठी महाराष्ट्रातील गुहागर, लाडघर आणि श्रीवर्धन या तीन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्लू फ्लॅग’पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्रासाठी ही पहिलीच आंतरराष्ट्रीय कामगिरी ठरली आहे. या किनाऱ्यांवर स्वच्छता, पाण्याची गुणवत्ता, पर्यावरण संवर्धन, पर्यटकांची सुरक्षितता आणि पायाभूत सुविधांच्या निकषांची पूर्तता करण्यात आली आहे.
मात्र, पर्यटन जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्गच्या किनारपट्टीला या यादीत स्थान मिळालेले नाही. भोगवे, निवती, तारकर्ली, देवबाग, वेंगुर्ला आदी किनारे निसर्गसौंदर्याच्या दृष्टीने जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ बनण्याची क्षमता बाळगतात. तरीही आवश्यक सुविधा आणि आंतरराष्ट्रीय निकषांच्या पूर्ततेबाबत जिल्हा प्रशासन व पर्यटन विभागाकडून किती ठोस काम झाले, याचा आढावा घेण्याची गरज आहे.
आता तरी सिंधुदुर्गच्या किनाऱ्यांकडे लक्ष द्या…!
ब्लू फ्लॅग मानांकन हे केवळ पर्यटनाचे प्रमाणपत्र नसून समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता, पर्यावरणाचे संरक्षण, सुरक्षितता आणि शाश्वत पर्यटन व्यवस्थापनाची आंतरराष्ट्रीय पातळीवरील पावती आहे. अशा मानांकनामुळे स्थानिक पर्यटनपूरक व्यवसाय, रोजगार आणि अर्थव्यवस्थेलाही चालना मिळू शकते.
रत्नागिरीने आंतरराष्ट्रीय मानांकनाचा टप्पा गाठला असताना सिंधुदुर्गातील भोगवेचा २०१९ पासूनचा प्रवास नेमका कुठे थांबला? मेढा-निवतीच्या २०२५ मधील प्रस्तावाचे काय झाले? या किनाऱ्यांसाठी आवश्यक निधी, पायाभूत सुविधा आणि पुढील कार्यवाही कधी होणार? पर्यटन विभाग आणि जिल्हा प्रशासनाने याबाबत वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची गरज आहे.
ब्लू फ्लॅगच्या जागतिक यादीत समाविष्ट होण्यासाठी सिंधुदुर्गचे किनारे प्रतीक्षेत…!












Leave a Reply