बर्ड वॉकमध्ये ५२ पक्षी प्रजातींची नोंद…!
सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी : यावर्षी ‘अल निनो’च्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी झाल्याने स्थलांतरित पक्षी वेळेपूर्वीच आणि मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत.
याच पार्श्वभूमीवर कुडाळ तालुक्यातील कुसबे गावातील ‘कोंकणाई ॲग्रो टुरिझम’ च्या वतीने आयोजित विशेष बर्ड वॉकमध्ये पक्षी निरीक्षकांनी कुसबे परिसरात तब्बल ५२ पक्षी प्रजातींची नोंद केली आहे. या उपक्रमाला जिल्हाभरातील पक्षीप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पक्ष्यांविषयी समाजात जागरूकता निर्माण करणे आणि स्थानिक जैवविविधतेची ओळख करून देणे हा या बर्ड वॉकचा मुख्य उद्देश होता. या उपक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून आलेले पक्षी निरीक्षक, पक्षी छायाचित्रकार, निसर्गप्रेमी आणि शालेय विद्यार्थी असे एकूण ३० हून जण सहभागी झाले होते.
निसर्गरम्य कुसबे परिसरात भ्रमंती करताना उपस्थितांना पक्ष्यांचे निरीक्षण, अभ्यास आणि छायाचित्रण करण्याची उत्तम संधी मिळाली.
या पक्षीनिरीक्षणा दरम्यान चेंजिबल हॉक ईगल, जंगल आउलेट, मलबार ग्रे हॉर्नबिल, ग्रेटर रॅकेट-टेल्ड ड्रोंगो, ब्लॅक-नेप्ड ओरिओल, कॉमन कुकू, पाइड कुकू, ऑरेंज-हेडेड थ्रश, व्हाइट-रम्प्ड शामा, टिकेल्स ब्ल्यू फ्लायकॅचर आणि निलगिरी फ्लॉवरपेकर यांसारख्या विविध दुर्मिळ व आकर्षक पक्ष्यांचे दर्शन घडले. सहभागींनी या पक्ष्यांचे नैसर्गिक वर्तन जवळून न्याहाळले.
महाराष्ट्रातील पक्षी निरीक्षकांच्या नोंदीनुसार, युरोपियन रोलर हा पक्षी यावर्षी कोकणासह संपूर्ण महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात मोठ्या प्रमाणावर आढळून आला आहे. तसेच जॅकोबीन कुकूची संख्याही लक्षणीय वाढली आहे. हवामानातील बदलांमुळे धनेश आणि गरुड यांसारख्या पक्ष्यांनी दरवर्षीच्या तुलनेत यंदा लवकर घरटी बनवण्यास सुरुवात केली आहे. पक्ष्यांच्या या बदलेल्या वर्तनावरून आगामी वर्षात जूनऐवजी एप्रिल किंवा मे महिन्यातच पाऊस सुरू होण्याची शक्यता पक्षी अभ्यासकांनी वर्तवली आहे.
या कार्यक्रम प्रसंगी पक्षी निरीक्षक प्रवीण सातोस्कर यांनी उपक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा. धीरेंद्र होळकर, वनविभागाचे सेवानिवृत्त अधिकारी सुभाष पुराणिक, डॉ. गणेश मर्गज आणि नूतन बांदेकर यांनी उपस्थितांना पक्षीनिरीक्षण, जैवविविधता व निसर्गसंवर्धनाचे महत्त्व या विषयांवर मार्गदर्शन केले. उपक्रमाच्या यशस्वीतेनंतर ‘कोंकणाई ॲग्रो टुरिझम’चे ओमकार गांवकर आणि प्रज्ञा गांवकर यांनी सर्व सहभागींचे व मार्गदर्शकांचे आभार मानले.
वातावरण बदलामुळे कुसबे परिसरात स्थलांतरित पक्ष्यांच्या संख्येत वाढ…!












Leave a Reply