अदानींचा जलविद्युत प्रकल्प आता सिंधुदुर्गात आंजीवडेच्या जंगलात..?


सिंधुदुर्गात १०० एकर सरकारी जमिनीची चाचपणी; सह्याद्रीच्या घनदाट जंगलावर संकटाचे सावट

निलेश राणे यांचा स्थानिकांना पाठिंबा : गावाचा विरोध असेल तर त्यांच्या सोबत राहणार…!

सिंधुदुर्ग/ विशेष प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव येथे प्रस्तावित असलेल्या अदानी समूहाच्या २१०० मेगावॅट क्षमतेच्या पंप्ड स्टोरेज जलविद्युत प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध झाल्यानंतर आता या प्रकल्पाचे सिंधुदुर्ग कनेक्शन चर्चेत आले आहे.
         असे समजते की, पाटगाव धरणाच्या पाण्याचा वापर करू देण्याच्या मूळ योजनेला स्थानिकांचा तसेच जिल्हा प्रशासनाचा विरोध झाल्याने कंपनी पर्यायी जागेच्या शोधात आहे.
             अलिकडेच कंपनीच्या कांही अधिकाऱ्यांनी पाटगाव पासून जवळच असलेल्या कुडाळ तालुक्यातील आंजीवडे गावात फेरफटका मारत जागेचा शोध घेतल्याचे समजते. या गावात कंपनीला सुमारे १०० एकर सरकारी जागा हवी असून त्यादृष्टीने महसूल यंत्रणेकडे चाचपणीही केल्याचे समजते.
           मात्र एवढी सलग सरकारी जमीन उपलब्ध होणार नाही, शिवाय बहुतांश जमीन ही वनक्षेत्रात येत असल्याने कंपनी आणखी कांही जागांच्या शोधात आहे.
         आंजीवडे  आणि परिसरातील बहुतांश क्षेत्र वनजमिनीचे असल्याने या प्रकल्पामुळे सह्याद्रीच्या घनदाट जंगलावर संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
     अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा हा प्रकल्प सुरुवातीला कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पाटगाव धरण आणि सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्यातील परिसराशी संबंधित होता. २१०० मेगावॅट क्षमतेच्या या प्रकल्पासाठी सुमारे ८,३७४ कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित होती. पाटगाव जलाशयातील पाण्याचा वापर करून वीजनिर्मिती करण्याच्या नियोजनाला स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला. त्यानंतर कंपनीने जानेवारी २०२४ मध्ये पाटगाव धरणातील विद्यमान पाण्याचा वापर करणार नसल्याचे कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला कळविले होते.पाटगावात विरोध होतो आहे या पार्श्वभूमीवर आता अंजिवडे येथे प्रकल्पासाठी  चाचपणी झाल्याची माहिती समोर येत आहे.
           आंजीवडे काय, शिवापूर काय, ही व अन्य गावे  सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेली आहेत. या भागात मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र असून काही भाग वगळता बहुतांश परिसर जंगलाने व्यापलेला आहे.                     पश्चिम घाटाच्या पर्यावरण संरक्षणासाठी माधव गाडगीळ समितीने केलेल्या शिफारशींच्या पार्श्वभूमीवर हा संपूर्ण पट्टा पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील आहे.
           असे समजते की,अदानी समूहाने यापूर्वी सादर केलेल्या पाटगाव प्रकल्पाच्या प्राथमिक पर्यावरणीय आराखड्यात १३९.५५ हेक्टर प्रकल्प क्षेत्रापैकी ११६.८० हेक्टर वनक्षेत्र असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. या आराखड्यात संबंधित जंगलाचे वर्णन ‘ दाट मिश्र जंगल आणि बांबूचे वनक्षेत्र असे करण्यात आले आहे . या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र प्रभावित होण्याची शक्यता मूळ प्रस्तावातूनच स्पष्ट होते.
वनविभागाच्या स्तरावर या परिसरातील जंगलाची घनता आणि जैवविविधतेबाबतही गंभीर निरीक्षणे असल्याचे सांगितले जाते.                       भीमाशंकरपेक्षाही या भागातील जंगल अधिक दाट असल्याचे मत व्यक्त करण्यात आल्याची माहिती आहे.अशा परिस्थितीत मोठ्या क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प येथे उभारायचा झाल्यास किती झाडे तोडावी लागतील, किती वनक्षेत्र बाधित होईल आणि स्थानिक जलस्रोतांवर काय परिणाम होईल, हे प्रश्न अनुत्तरित आहेत.मात्र आंजीवड्यात प्रकल्प झाल्यास जैवविविधतेचा मोठया प्रमाणावर नाश होण्याची शक्यता पर्यावरण तज्ञ् व्यक्त करत आहेत.

निलेश राणे  स्थानिकांसोबतच…!

       दरम्यान आज झालेल्या पत्रकार परिषदेत  शिंदे सेनेचे स्थानिक आमदार डॉ. निलेश राणे  यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात आले असता  त्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली. आंजीवडे  येथील प्रस्तावित प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा आणि गावाचा विरोध असेल, तर स्थानिक आमदार म्हणून आपण त्यांच्या सोबत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या प्रकल्पाबाबत स्थानिकांच्या भूमिकेला राजकीय पाठबळ मिळण्याची चिन्हे आहेत.
           पाटगावचा प्रश्न सुटला म्हणून सह्याद्रीच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या सिंधुदुर्गच्या जंगलावर विकासाच्या नावाखाली नवा भार टाकला जाणार आहे काय, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. वीजनिर्मिती आणि ऊर्जा साठवणूक हे महत्त्वाचे विषय असले, तरी त्यासाठी पर्यावरणाची किती किंमत मोजायची, याचाही विचार व्हायला हवा असे पर्यावरण तज्ञांचे म्हणणे आहे.
        दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची जिल्हा मुख्यालयात पत्रकार परिषद ठरली होती मात्र ती अचानक रद्द करण्यात आल्याने अनेक तर्कवितर्क आणि चर्चा सुरु होती.

आंजीवडे गाव,  कुडाळ तालुक्यातील एक निसर्गरम्य आणि दुर्गम गाव आहे.हे गाव सह्याद्रीच्या कुशीत वसलेले असून कुडाळ तालुक्याच्या पूर्व टोकाला आहे. आंजिवडे गावानंतर ऐतिहासिक शिवकालीन पायवाटेने (किंवा आंजिवडे-पाटगाव घाटरस्त्याने) सुमारे ४ ते ५ किमी अंतर पार केल्यावर कोल्हापूर जिल्ह्यातील ‘भुदरगड’ तालुक्यातील पाटगाव (मधाचे गाव) येथे प्रवेश करता येतो. हा मार्ग कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा एक मुख्य दुवा मानला जातो.
     हे गाव कुडाळ तालुक्याच्या मुख्य ठिकाणापासून (तहसील मुख्यालय) सुमारे २५ किमी आणि जिल्हा मुख्यालय ओरोस, पासून जवळपास ३० किमी अंतरावर आहे. गावाची  लोकसंख्या ३०० असून  ८० घरे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *