आनंद मिळवून देणारे शास्त्र म्हणजे अध्यात्मशास्त्र ! – सद्गुरु सत्यवान कदम


18-Jan-26
गोमराई (ता. दापोली) येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर प्रवचन

सद्गुरु सत्यवान कदम
दापोली, १८ जानेवारी (वार्ता.) – मानवासहित सर्व प्राणी मात्र सर्वोच्च सुख कसे मिळेल ? यासाठी धडपडत असतात; मात्र हे सुख कसे मिळवावे ? हे दुर्दैवाने शाळा-महाविद्यालयांमध्ये शिकवले जात नाही. त्यामुळे सर्वोच्च सुख मिळवण्याची धडपड आपली चालूच रहाते. सर्वोच्च आणि सतत टिकून रहाणार्‍या सुखास अध्यात्माच्या परिभाषेत आनंद असे म्हणतात हा आनंद मिळवून देणारे शास्त्र म्हणजे अध्यात्मशास्त्र होय, असे मार्गदर्शन सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांनी केले.

तालुक्यातील गोमराई मारुति मंदिर येथे १४ जानेवारी या मकरसंक्रांतीच्या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर आयोजित प्रवचनात सद्गुरु सत्यवान कदम ते बोलत होते.



प्राणीमात्रांचे ध्येय, सुख-दुःखाची कारणे, दुःख निवारणाचा खरा उपाय म्हणजे साधना, पितृदोष, पितृदोष निवारणासाठी श्री गुरुदेव दत्त या नामजपाचे महत्त्व, वास्तूदोष, तसेच प्रारब्ध म्हणजे काय ? आणि साधनेमुळे प्रारब्ध कसे सुसह्य होते ?कुलदेवतेच्या नामाचे महत्त्व आदि विषयी सद्गुरु सत्यवान कदम यांनी मार्गदर्शन केले.

या वेळी सद्गुरु कदम यांचे स्वागत मुंबई मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल म्हातले यांनी केले. या प्रवचनाला गोमराई गावचे ग्रामीण कार्यकारिणी अध्यक्ष सुभाष घुबडे, उपाध्यक्ष विश्वास जाधव यांच्यासह १९० जिज्ञासूंनी या प्रवचनाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी वीणा पांगत यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *