पोलिसांच्या तत्परतेमुळे महिलेला जीवदान
वैभववाडी (प्रतिनिधी): आचिर्णे जंगलात बेवारस व अचेतन अवस्थेत सापडलेल्या केरळ राज्यातील एका मनोरुग्ण महिलेला वैभववाडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि संवेदनशीलतेमुळे जीवदान मिळाले आहे. बुधवारी रात्री आचिर्णे येथील जंगल परिसरात एक महिला अत्यंत गंभीर अवस्थेत पडली असल्याची माहिती ग्रामस्थांनी वैभववाडी पोलीस ठाण्याला दिली. ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या आदेशानुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल शैलेश कांबळे, कॉन्स्टेबल लक्ष्मीप्रसाद हाके, महिला पोलीस कॉन्स्टेबल काजल पाटोळे, कॉन्स्टेबल धडे व चालक कांबळे यांचे पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले.
घटनास्थळी अंदाजे ५५ ते ६० वयोगटातील एक महिला अंधारात थंडीने कुडकुडत आणि प्रचंड अशक्त अवस्थेत पडलेली आढळून आली. पोलिसांनी तिला आधार देऊन पाणी दिले आणि प्राथमिक चौकशी केली. मात्र, संवादादरम्यान तिला मराठी किंवा हिंदी येत नसल्याचे लक्षात आले. पोलिसांनी तिला तातडीने पोलीस ठाण्यात आणून जेवणाची व्यवस्था केली. ती थोडी स्थिर झाल्यावर मल्याळम भाषेच्या जाणकारांच्या मदतीने तिची माहिती घेण्याचे प्रयत्न सुरू झाले. वैभववाडीतील केरळी बेकरी व्यावसायिक आणि आणखी एका व्यक्तीच्या मदतीने पोलिसांनी माहिती मिळवली आणि तांत्रिक तपासाचा आधार घेत केरळमधील तिचे गाव व पोलीस ठाणे शोधून काढले.
तपासाअंती या महिलेचे नाव कुंजामिनो कुणीमोईद्दीन कुट्टी (वय ५८, रा. कल्लारमंगल, केरळ) असल्याचे निष्पन्न झाले. केरळमधील कांडांमजुबा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता, ही महिला २० जानेवारीपासून बेपत्ता असल्याची तक्रार तेथे नोंदवण्यात आल्याचे समोर आले. पोलिसांनी व्हॉट्सॲपद्वारे पाठवलेला फोटो जुळल्यानंतर केरळ पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांना माहिती दिली. गुरुवारी मध्यरात्री महिलेचा भाऊ, वहिनी व केरळ पोलीस वैभववाडीत दाखल झाले आणि त्यांनी या महिलेला सुखरूप ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात असताना महिला पोलीस हवालदार तनुजा तावडे व महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रीती शिंगाडे यांनी या महिलेची मायेने काळजी घेत तिला नवीन कपडेही उपलब्ध करून दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेचा पती पॅलेस्टाईन येथे तर मुलगा सिंगापूर येथे कामाला आहे. ती केरळ येथून रेल्वेने प्रवास करत वैभववाडी परिसरात आली असावी आणि आचिर्णे स्थानकावर उतरून जंगलात भरकटली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे तिच्या अंगावर सोन्याचे दागिने आणि पर्समध्ये पैसे सुरक्षित होते. वैभववाडी पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे आणि माणुसकीमुळे एका जिवाचे रक्षण झाले असून, “आजही माणुसकी जिवंत आहे” याची प्रचिती आल्याने संपूर्ण परिसरातून पोलीस दलाचे अभिनंदन होत आहे.
****
केरळमधील बेपत्ता महिला वैभववाडी पोलिसांच्या ताब्यातपोलिसांच्या तत्परतेमुळे महिलेला जीवदान








Leave a Reply