खूडी पन्हळीवाडी ग्रामस्थांचा जिल्हा परिषद निवडणुकीवर सामूहिक बहिष्काराचा इशारा





*देवगड* – तालुक्यातील खुडी-पन्हळीवाडी येथील ग्रामस्थांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीवर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. याविषयी लेखी निवेदन तहसीलदारांना देण्यात आले असून, जोपर्यंत रस्त्याचे काम पुन्हा सुरू होत नाही, तोपर्यंत मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.

निवेदनात म्हटले की,
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ‘खुडी-देऊळवाडी-पन्हळीवाडी’ हा रस्ता मंजूर झाला असून त्याचे कामही सुरू झाले होते. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून पन्हळीवाडी ते पोयरेसिमा या टप्प्यातील काम अचानक थांबवण्यात आले आहे. हे काम ग्रामपंचायत प्रशासनाकडून जाणीवपूर्वक थांबवण्यात आल्याचा आरोप पन्हळीवाडीतील रहिवाशांनी केला आहे.
खुडी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य या कामात आडकाठी आणत आहेत. पन्हळीवाडी ते पोयरेसिमा हा रस्ता रद्द करण्यासाठी सरपंचानी जिल्हा परिषद बांधकाम विभागाला पत्र दिल्याची माहिती समोर येत आहे. याविषयी विचारणा करण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांना सरपंचांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
आमच्या हक्काच्या रस्त्याचे काम राजकारणामुळे थांबवले जात असेल, तर आम्ही लोकशाहीच्या प्रक्रियेत सहभागी होणार नाही,” अशी भूमिका पन्हळीवाडीतील ग्रामस्थांनी घेतली आहे. जोपर्यंत प्रत्यक्ष काम सुरू होत नाही, तोपर्यंत ही लढाई सुरूच राहील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली असून प्रशासन यावर काय तोडगा काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *